रांची : जगभरातून कोरोनाचे रुग्ण आणि त्यातील काहींचे मृत्यू या बातम्या रोज वाचाव्या लागत आहेत. पण झारखंडमधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे आधी ८८ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. आईला खांदा देणारी पाच मुलेही याच आजाराने मृत्युमुखी पडली. अवघ्या १५ दिवसांत कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव दु:खात आणि भीतीच्या सावटाखाली आहे. त्या कुटुंबातील आणखी काही जणांची प्रकृती बिघडली आहे.
झारखंडमधील धनबादच्या कतरास येथील ही घटना आहे. राणी बाजारात हे कुटुंब राहत होते. ४ जुलै रोजी ८८ वर्षीय आईचे बोकारो येथील नर्सिंग होममध्ये निधन झाले. ती कोरोनाबाधित असल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. नंतर तिच्या एका मुलाचा मृत्यू रांचीमधील रिम्स कोविड रुग्णालयात झाला. दुसऱ्या मुलाला केंद्रीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे त्याचाही मृत्यू झाला.
तांडव इथेच थांबले नाही तर तिसरा मुलगा धनबादच्या खासगी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला. तिथे त्याचाही मृत्यू झाला. १६ जुलै रोजी चौथा मुलगा जमशेदपूरमध्ये मरण पावला. त्याला कर्करोग होता. पाचव्या मुलाला धनबादवरून रिम्स रुग्णालयात हलवले. तिथे तो सोमवारी मरण पावला. (वृत्तसंस्था )
विवाह समारंभात बाधा?
ही महिला जूनमध्ये दिल्लीत एका लग्नाला गेली होती. परतल्यानंतर तिची तब्येत बिघडली होती. मात्र तिला कोरोनाचा संसर्ग झाला होता, हे निधनानंतरच उघड झाले.