नवी दिल्ली : कोविड-१९ योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेनादलातर्फे ३ मे रोजी देशात हवाई संचलने होणार असून, रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपिन रावत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.कोविडविरोधी लढ्यात सेनादल या योद्ध्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही रावत यांनी दिली. ते म्हणाले, ३ मे रोजी संध्याकाळी कोविड-१९ योद्ध्यांच्या सन्मानार्थ श्रीनगर ते थिरूवनंतपुरम, तसेच दिब्रूगढ ते कच्छ अशा दोन हवाई मार्गांवरून हवाई संचलन केले जाईल.यात हवाई दलाची फिक्स्ड विंग व लढाऊ विमाने सहभागी होतील. याच दिवशी युद्धनौकांवर रोशणाई केली जाणार असून, चॉपर्सद्वारे कोविड-१९ रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली जाईल. सेनादलाचे वाद्यवृंद या रुग्णालयांसमोर बँडवादन करतील, असे सांगून रावत म्हणाले, ‘‘देशाने या आपत्तीचा मुकाबला करताना संघशक्तीचे विस्मयकारी प्रदर्शन घडवले आहे.’’
CoronaVirus News: कोविड योद्ध्यांसाठी सेनादलातर्फे उद्या रुग्णालयांवर होणार पुष्पवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 6:10 AM