मुंबई: ओमायक्रॉनच्या BA2 सबव्हेरिएंटनं दक्षिण कोरियात धुमाकूळ घातला आहे. दक्षिण कोरियामध्ये दररोज ६ लाख कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. चीनमधील परिस्थितीदेखील हाताबाहेर जाताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे भारतातील नागरिकांची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची चौथी लाट येणार का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
देशात आता लगेचच कोरोनाची चौथी लाट येईल, असं तज्ज्ञांना वाटत नाही. तिसऱ्या लाटेदरम्यान तयार झालेली प्रतिकारशक्ती आणि लसीकरणाचं वाढलेलं प्रमाण यामुळे चौथी लाट लगेच येण्याचा धोका नाही. 'इतर देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊन गेली. त्यामुळे भारतातही चौथी लाट येण्याचा धोका आहे,' अशी माहिती राज्याच्या आरोग्य सेवेचे माजी संचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिली. चौथी लाट कधी येईल आणि ती किती तीव्र असेल, हे आताच सांगता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. साळुंखे सध्या राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार आहेत.
ओमायक्रॉन व्हेरिएंट आतापर्यंत ५० हून अधिकवेळा म्युटेट झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबर २०२१ मध्ये सर्वप्रथम आढळून आलेल्या ओमायक्रॉनची दहशत सध्या संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही सुदैवानं अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नाही. याशिवाय मृत्यूंचं प्रमाणदेखील कमी आहे. लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे.
देशात मुंबई ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट ठरली होती. ७ जानेवारीला मुंबईत २० हजार ९७१ रुग्ण आढळून आले होते. 'तिसऱ्या लाटेला सुरुवात होण्याआधी ओमायक्रॉनचे BA1 आणि BA2 व्हेरिएंट सक्रीय होते. जिनॉम सिक्वन्सिंगमधून ही माहिती समोर आली होती,' अशी माहिती राज्य सरकारच्या कोविड १९ टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. शशांक जोशी यांनी दिली.