नवी दिल्ली - कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,299 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,879 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच आता दिल्लीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू कऱण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड बसणार आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने खबरदारीच्या दृष्टीने आता पावलं उचलली आहे. पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू केली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीचे पालन न कऱणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच खासगी चारचाकी गाडीने जर प्रवास करत असाल तर मास्क न घातल्यास दंड आकारला जाणार नाही असं म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नियमावलीचं पालन करा असं प्रशासनाच्या वतीने सांगतण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 2146 रुग्ण आढळले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी 2495 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दिल्लीत कोरोनाचा डेली पॉझिटिव्हीटी दर 15.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनच्या BA.2 आणि BA.5 चे सब व्हेरिएंट सापडले आहे. त्यामुळे वेगाने रुग्णांची संख्या वाढत असल्याचं म्हटलं आहे.