नवी दिल्ली : अनेक लसी अगदी सहा महिन्यांपूर्वी चाचणीच्या पातळीवर होत्या. कोरोनाचा वाढता प्रसार, पाहता लसींची गरज येत्या काळात मोठ्या प्रमाणात भासणार आहे, याचा अंदाज येणे म्हणजे काही रॉकेट सायन्स नव्हते. ही बाब तेव्हाच लक्षात यायला हवी होती आणि त्यानुसार पावले उचलली गेली पाहिजे होती, असा टोला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अदर पूनावाला यांना हाणला आहे. दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य आणि कोव्हिड कृती दलाचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूटकडून आलेल्या प्रस्तावाविषयी सूतोवाच करताना त्यांच्या मागणीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
काय आहे नेमके प्रकरण?
- अदर पूनावाला यांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोविशिल्ड या लसीचा साठा वाढवायचा असेल तर सीरमची उत्पादनक्षमता वाढवावी लागेल आणि त्यासाठी ३ हजार कोटी रुपये तसेच तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागेल, असे सांगितले आहे. - लसीच्या पुरवठ्यावरून सीरम इन्स्टिट्यूटला ॲस्ट्राझेनेकाने कायदेशीर नोटीसही बजावली आहे. - या सगळ्यावर सविस्तर प्रतिक्रिया देताना डॉ. गुलेरिया यांनी वरीलप्रमाणे टोला हाणला. ते पुढे म्हणाले की, उत्पादनक्षमतेबाबत लसनिर्मात्यांना पूर्वकल्पना यायला हवी होती.
- केवळ भारतातच नाही तर लस जगात इतरत्रही पाठवायची आहे, याची पूर्वकल्पना त्यांना होती. मात्र, ते आता म्हणत आहेत की उत्पादन वाढवावे लागेल वगैरे. लसीची मागणी कायम चढत्या भाजणीचीच राहील, हे सांगायला काही रॉकेट सायन्सची गरज नव्हती.