नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा झपाट्याने होत असलेल्या फैलावामुळे जग चिंताक्रांत झाले असून, भारतातील परिस्थिती लवकर निवळावी यासाठी अमेरिकेसह विविध देशांनी मदतीचा हात पुढे करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यात चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांचाही समावेश आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी बायडेन प्रशासनाला पत्र लिहून भारताला अमेरिकेकडील लससाठा खुला करून द्यावा, अशी विनंती केली आहे. अमेरिकी नागरिकांना पुरून उरतील एवढा लससाठा आपल्याकडे असून, त्यापैकी आवश्यक साठा भारताला द्यावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनीही भारतातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सांगत भारताला कोणत्या प्रकारे मदत करता येईल, यावर आम्ही विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच विचारांना मूर्तरूप दिले जाईल, असे संकेतही ब्लिंकेन यांनी दिले आहेत. समस्त भारतीय जनता सध्या एका कठीण काळातून जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भारताला हवी ती मदत करण्यासाठी फ्रान्स सज्ज आहे, असे आश्वासन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिले आहे.
युरोपीय महासंघाकडून आश्वासन
कोरोनाने भारतात हाहाकार माजवला आहे. अशास्थितीत आमची सहानुभूती आहे. ८ मे रोजी होणाऱ्या भारत-युरोपीय महासंघ शिखर परिषदेत या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारताला काय मदत करता येईल, यावर आम्ही विचार करू, असे मत युरोपीय महासंघ परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी नोंदवले आहे.
पाकिस्तानचीही तयारी
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारताला या कठीणसमयी मदतीची तयारी दर्शवली आहे. कोरोनाचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान भारताला मदत करण्यास तयार आहे, असे इम्रान खान यांनी नमूद केले.
चीन चर्चेस तयार
कोरोनाशी लढण्यासाठी भारताला हवी ती मदत करण्याची तयारी आहे. त्यासंदर्भात आम्ही भारताशी चर्चा करायला तयार आहोत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शाओ लिजियान यांनी स्पष्ट केले आहे.