नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट टाळण्यासाठी सरकार, प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सीरो सर्वेक्षणांच्या माध्यमातून कोरोनाचा सर्वाधिक धोका कोणाला याबद्दलची माहिती गोळा केली जात आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सनं (एम्स) गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणातून एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.
एचआयव्ही/ एड्सच्या रुग्णांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती सीरो सर्वेक्षणातून समोर आली होती. गेल्या वर्षी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान एम्सनं केलेल्या सीरो सर्वेक्षणात एचआयव्ही/एड्सच्या १६४ रुग्णांचा समावेश होता. यातील १४ टक्के रुग्णांच्या शरीरात एँटीबॉडी आढळून आल्या. किती लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी आहेत ते पाहण्यासाठी सीरो सर्वेक्षण करण्यात येतं.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १६४ पैकी २३ जणांच्या शरीरात अँटिबॉडी आढळून आल्या. एचआयव्ही रुग्णांमध्ये १४ टक्के सीरो पॉझिटिव्हिटीची नोंद करण्यात आली. त्याचवेळी दिल्लीतील सरासरी सीरो पॉझिटिव्हिटी २५.५ टक्के होती. इतरांच्या तुलनेत एचआयव्हीच्या रुग्णांना कोरोनाचा धोका कमी असल्याचं सर्वेक्षणातील आकडे सांगतात. हे नेमकं कशामुळे झालं हा आता संशोधनाचा विषय आहे.
इतरांच्या तुलनेत कोरोनाचा धोका कमी असला तरी एचआयव्हीच्या रुग्णांनी फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करायला हवं. मास्कचा वापर करायला हवा, असं संशोधकांनी म्हटलं. बरेचसे एचआयव्ही रुग्ण घरातच राहतात. त्यामुळे ते फार लोकांच्या संपर्कात येत नाहीत. या कारणामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव होत असावा, असं काही तज्ज्ञांना वाटतं.