नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी उद्यापासून विशेष ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे.
उद्यापासून म्हणजेच १२ मेपासून या ट्रेन नवी दिल्ली येथून धावतील. यासाठी प्रवाशांना आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने या ट्रेनमध्ये प्रवास करणार्या लोकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रवाशांना प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. तसेच, मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये रेल्वे स्थानकात प्रत्येक प्रवाशांने सोशल डिस्टंसिंग, कन्फर्म तिकीट आणि मास्क लावणे आदींचा समावेश आहे.
गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे...- ट्रेन कोणत्या मार्गावर धावेल आणि कधी धावेल यावर रेल्वे मंत्रालय निर्णय घेईल.- केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात असेल.- ज्यांचे ऑनलाइन तिकीट कन्फर्म झाले आहे. त्यांनाच स्टेशनवर येण्याची परवानगी असेल.- ऑनलाइन तिकीटाच्या आधारे कोणत्याही प्रवाशाला किंवा कॅब चालकाला परवानगी असेल.- प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय तपासणी केली जाईल.- प्रत्येक कंपार्टमेंट, रेल्वे स्थानक प्रवेशद्वार आणि एक्झिट गेटमध्ये सॅनिटायझरची सुविधा असेल.- प्रत्येक प्रवाश्याला स्टेशन आणि रेल्वेमध्ये मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.- ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक असेल.
दरम्यान, भारतीय रेल्वेने १२ मेपासून स्पेशल पॅसेंजर ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. या ट्रेन नवी दिल्लीतून देशातील १५ विविध शहरांपर्यंत धावणार आहेत. या पॅसेंजर ट्रेनसाठी प्रवाशांना आज दुपारी ४ वाजल्यापासून ऑनलाइन बुकिंग सुरू होणार आहे. मात्र, यासाठी रेल्वे स्टेशनच्या तिकिट काऊंटरद्वारे बुकिंग केले जाणार नाही.
या विशेष ट्रेन नवी दिल्लीतून दिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या शहरांमध्ये धावणार आहेत.
आणखी बातम्या -विमान सेवा सुरू होणार? एजन्सींच्या पथकाची दिल्ली विमानतळाला भेट!आजपासून पॅसेंजर ट्रेनसाठी बुकिंग सुरू; पण, यासाठी काय करावं लागेल?