नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 2,83,07,832 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,788 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,207 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,35,102 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बिहारमधील एका गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र गावकरी आणि नातेवाईकांनी कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. पतीच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही त्यामुळे पत्नीने एकटीने मुखाग्नी दिल्याची घटना घडली आहे. सकरवासा येथील 67 वर्षीय त्रिभुवन सिंह यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी पाठ फिरवली. अधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर पत्नीने एकटीने अंत्यसंस्कार केले आहेत.
पत्नीने पीपीई किट घालून आपल्य़ा पतीला मुखाग्नी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सूरु असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका रुग्णालयाने कोरोना रुग्णाला तब्बल 19 लाखांचं बिल दिलं आणि 8 लाख दिल्यानंतर देखील मृतदेह देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण बिल न दिल्यामुळे रुग्णाचा मृतदेह देणार नसल्याचं खासगी रुग्णालयाने म्हटलं आहे.
धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं 19 लाखांचं भलं मोठं बिल; 8 लाख भरले तरी दिला नाही मृतदेह
उन्नाव येथील अनिल कुमार यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. लखनऊच्या टेंडर पाम रुग्णालयात अनिल यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर खासगी रुग्णालयाने तब्बल 19 लाखांचं बिल दिलं. अनिल यांनी आठ लाख रुपयांचं बिल भरलं. मात्र बाकीचं बिल अद्याप भरलेलं नाही. त्यामुळे रुग्णालयाने त्यांच्या पत्नीचा मृतदेह देण्यास नकार दिला आहे. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मृतदेह मागितला असल्यास रुग्णालयाने माझ्याकडे आणखी 10.75 लाख मागितले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही अशी माहिती अनिल यांनी दिली आहे.