नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा बुधवारी संध्याकाळपर्यंत २ लाख १६ हजारवर पोहोचला आहे. यातच हैदराबाद येथील सेंटर फॉर सेलुलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) येथील शास्त्रज्ञांना देशातील कोरोना संक्रमित लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस (SARS-CoV2) आढळला आहे. हा कोरोना व्हायरस सध्या हे मुख्यतः तामिळनाडू आणि तेलंगणा सारख्या दक्षिणेकडील राज्यात आढळला आहे, असे दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
शास्त्रज्ञांनी व्हायरसच्या या अनोख्या समुहाला 'क्लेड ए 3 आय' असे नाव दिले आहे, जे भारतातील जीनोम (जीनोमचा समूह) सीक्वेन्सच्या 41 टक्के नमुन्यांमध्ये आढळले आहेत. शास्त्रज्ञांनी 64 जीनोमचे सीक्वेन्स तयार केले आहेत. सीसीएमबीने ट्विट केले की, "भारतात SARS-CoV2 चे फैलाव जीनोम विश्लेषणावर एक नवीन तथ्य समोर आले आहे. संशोधनानुसार, विषाणूंचा एक अनोखा समूह देखील भारतात अस्तित्वात आहे. त्याचे नाव 'क्लेड ए 3 आय' (CLADE-A3i) आहे. "
'क्लेड ए 3 आय'च्या समुहाचा जन्म फेब्रुवारी 2020 मध्ये व्हायरसने झाला आणि तो देशभर पसरला आहे. त्यात भारतात घेण्यात आलेल्या SARS-CoV2 जीनोमच्या सर्व नमुन्यांपैकी 41 टक्के आणि जागतिक जीनोमच्या साडेतीन टक्के सार्वजनिक आहेत, असे सीसीएमबीने म्हटले आहे.
सीसीएमबी हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अंतर्गत येते. सीसीएमबीचे संचालक आणि संशोधनचे सह-लेखक राकेश मिश्रा म्हणाले की, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून घेतले जाणारे बहुतेक नमुने 'क्लेड ए 3 आय'सारखे आहेत. जास्तकरून नमुने भारतात कोविड -19 चा फैलाव होण्याच्या सुरुवातीच्या काळातील आहेत, असेही राकेश मिश्रा म्हणाले.
दरम्यान, दिल्लीत सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या नमुन्यांशी काही प्रमाणात 'क्लेड ए 3 आय' साम्य आहे. मात्र, महाराष्ट्र आणि गुजरातमधील नमुन्यांशी काहीही साम्य नाही. कोरोना व्हायरसचा हा प्रकार सिंगापूर आणि फिलिपिन्समध्ये सापडलेल्या कोरोना प्रकरणांसारखेच आहे, असेही राकेश मिश्रा यांनी सांगितले.