नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्यानं घरसण सुरू आहे. मात्र आता डेल्टा प्लस व्हेरिएंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. आता हा डेल्टा विषाणू म्युटेट झाला असून तो डेल्टा प्लस झाला आहे. हा व्हेरिएंट अधिक संक्रामक असून त्यामुळेच देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवला जात आहे.तिसऱ्या लाटेत राज्यात किती जणांना होऊ शकते कोरोनाची बाधा? मंत्र्यांनी सांगितला भीतीदायक आकडा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला. अनेक राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा अक्षरश: मोडकळीस आली. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत काय होणार याची चिंता सर्वांना सतावत आहे. मात्र आयसीएमआरनं संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास तेव्हा निर्माण होणारी परिस्थिती दुसऱ्या लाटेइतकी गंभीर नसेल, असं आयसीएमआरचा अहवाल सांगतो. लसीकरण अभियानाला गती दिल्यास भविष्यात येणाऱ्या संकटाला सक्षमपणे तोंड देता येईल, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
तिसऱ्या लाटेत नेमकी काय परिस्थिती असू शकते याचा आढावा आयसीएमआरनं अहवालातून घेतला आहे. 'रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे एकदा कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना पुन्हा कोरोना होऊ शकतो,' अशी भीती आयसीएमआरनं व्यक्त केली आहे. 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा गर्भवतींना मोठा फटका बसला होता. त्यामुळे कोराबाधित गर्भवतींची संख्या वाढली होती. मात्र आता लस उपलब्ध आहे. गर्भवतींसाठी लसीकरण अतिशय उपयुक्त आहे. आरोग्य मंत्रालयानं याबद्दलच्या मार्गदर्शक सूचनादेखील दिल्या आहेत,' अशी माहिती आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं.