नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासांत 403,738 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 4092 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,86,444 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी 401,078 नव्या कोरोनाबाधितांचं देशात निदान झालं होतं.
गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. दिलासादायक बाब ही, की 24 तासांत देशभरातून 3 लाख 86 हजार 444 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील कोरोना मृत्यूदरात वाढ झाली आहे. देशाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट 82 टक्क्यांहून कमी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 17 टक्क्यांहून अधिक झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्ठानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
महाराष्ट्रात दिवसभरात 82 हजार 266 रुग्ण, तर 864 मृत्यू
राज्यात शनिवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. यात दिवसभरात 82 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यत एकूण 43 लाख 47 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात 53 हजार 605 रुग्ण तर 864 मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.03 टक्के असून मृत्युदर 1.49 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 91 लाख 94 हजार 331 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17.31 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 37 लाख 50 हजार 502 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28 हजार 453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.