नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहाचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. तसेच या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं देखील गमावली आहेत. कोरोनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत.
कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे. एका डॉक्टरने कोरोनामुळे आपल्या वडिलांना गमावलं आहे. मात्र तरी देखील ते डॉक्टर हे दु:ख बाजूला सारून रुग्णांची मदत करत आहे. श्रीप्रकाश पाठक असं या डॉक्टरचं नाव आहे. कोरोनातील संकटांसमोर त्यांनी हिंमत नाही हारली. श्रीप्रकाश पाठक हे जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आहेत. त्यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.
कोरोना रुग्णांची सेवा करत असताना पाठक यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना देखील लागण झाली. वडिलांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र त्यांनी हार न मानता कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आणि पुन्हा एकदा रुग्णसेवेत ते तत्पर झाले. कोरोना रुग्णांवर गेल्या कित्येक दिवसांपासून उपचार करत आहेत. रुग्णाचा जीव वाचवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळतं असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा विस्फोट! दर 2 मिनिटाला 'या' देशात होतोय एकाचा मृत्यू; लसीचाही मोठा तुटवडा
काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दर 2 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. तर कोरोना लसीचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराण सरकारनेच याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी कोरोनामुळे 588 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. इराणच्या प्रशासनाने कोरोनाचा कहर वाढण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणं आणि मास्क न लावणे या गोष्टींना जबाबदार धरलं आहे. देशातील अनेक शहरांतील रुग्णालयामध्ये बेडची मोठी कमतरता आहे. सोशल मीडियावर लोक सरकार आणि लसीकरण यावरून जोरदार निशाणा साधत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत इराणमध्ये 94603 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसांत 40 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दर 2 सेकंदाला एका व्यक्तीला कोरोनाची लागण होत आहे. तर दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे.