नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,21,49,335 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53,480 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 354 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,62,468 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही सरकारचं नीट लक्ष आहे. मात्र आता कुंभमेळा (Kumbh Mela 2021) काळात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. तसेच धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिद्वारमध्ये देखील कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हरिपूर कलास्थित प्रमुख गीता कुटीर आश्रमात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच टिहरी स्थित ताज हॉटेलमधील 83 स्टाफ कोरोना संक्रमित आढळल्याची माहिती मिळत आहे. कुंभमेळ्याच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला मोठा धक्का बसला आहे. आरोग्य विभागाने सर्व लोकांना आयसोलेट केलं असून हॉटेल सील करण्यात आलं आहे. कुंभमेळा 2021 साठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. 1 एप्रिलपासून महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूसहीत 12 राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगावा लागणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वेगवेगळ्या आश्रमांत आणि मठ-मंदिरात दर्शनासाठी दाखल होणाऱ्या श्रद्धाळूंची थर्मल स्कॅनिंग केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल. यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर देशात कोरोनाचा धोका वाढल असून कुंभमेळा होत असल्याने केंद्र सरकार सतर्क झालं आहे.
हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी करण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची केंद्रीय पथकाने पाहणी केली. या पाहणीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंडच्या सचिवांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने पॉझिटिव्ही रेट वाढण्याची भीती आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना चाचण्या वाढवण्यात याव्यात. त्याचबरोबर भाविकांबरोबरच स्थानिक नागरिकांच्याही चाचण्या करण्यात याव्यात, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंड सरकारला सांगितलं आहे.