नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी चिंताजनक असून आतापर्यंत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक 2644 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 83 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 39980 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 39980 लोकांना कोरोनाची लागण झाली. ज्यामध्ये 1301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10632 रुग्ण या आजारापासून बरे झाले आहेत. तर कोरोनाचे 28046 रुग्ण देशात सक्रीय आहेत.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असेल आणि ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे.