नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील रुग्णांचा आकडा 66 लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61,267 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 884 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 66 लाख 49 हजारांवर पोहोचली. आतापर्यंत 1 लाख 3 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 75 हजार 675 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 56 लाख 62 हजार 491 लोक बरे झाले आहेत. गेल्या 26 दिवसांत, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 10.17 लाखांवरून ती 9.19 लाखांवर पोहोचली आहे. देशात सध्या 9 लाख 19 हजार 023 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत कोरोनाचा धोका कायम असल्याची माहिती आता समोर आली आहे. सध्या सण-समारंभाचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात मास्क घालूनच सर्व सण साजरे करावेत असा सल्ला केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्केमहाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी दिवसभरात 12 हजार 982 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत 11 लाख 62 हजार 585 रुग्ण कोविडमुक्त झाले. दिवसभरात 10 हजार 244 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 263 मृत्यूंची नोंद झाली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर 2.64 टक्के आहे. सध्या 2 लाख 52 हजार 277 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 53 हजार 653 वर पोहोचली असून बळींचा आकडा 38 हजार 347 झाला आहे. सध्या 22 लाख 160 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 26 हजार 749 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
केंद्र सरकारने दिला मोलाचा सल्लासण-समारंभ असल्याने लोक एकमेकांना भेटण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळी मास्क लावण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) दुसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरदरम्यान हे सीरो सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामध्ये 10 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार 6.6 टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे.