नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण पावणेतीन टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे २.७२ टक्के असून त्यांची संख्या २७७३०१ इतकी आहे. या संसर्गातून ९७.८२ लाख लोक बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९५.८३ टक्के तर कोरोना रुग्णांचा मृत्युदर अवघा १.४५ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात सोमवारी २००२१ नवे रुग्ण आढळून आले, तर २११३१ जण बरे झाले. या दिवशी आणखी २७९ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या १४७९०१ झाली आहे. देशात १०२०७८७१ कोरोना रुग्ण असून त्यातील ९७८२६६९ जण बरे झाले. जगभरात ८ कोटी ११ लाख कोरोना रुग्ण असून ५ कोटी ७३ लाख लोक बरे झाले आहेत. अमेरिकेत १ कोटी ९५ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी १४ लाख जण बरे झाले. त्या देशात ७७ लाख सक्रिय रुग्ण व बळींचा आकडा ३ लाख ४१ हजार आहे.
भारताला अग्रक्रमाने लस देणार
अदर पूनावाला म्हणाले की, भारत हा देखील कोव्हॅक्स यंत्रणेचा भाग आहे. कोविशिल्ड लसीचे आम्ही वेळोवेळी जे उत्पादन करू त्यातील निम्मा भाग भारताला व निम्मा भाग कोव्हॅक्स यंत्रणेला देणार आहोत. भारताला अग्रक्रमाने कोविशिल्ड लस देण्यात येईल.