नवी दिल्लीः ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं खुली ठेवण्यासाठी केंद्रानं सशर्त परवानगी दिली आहे. ग्राहकांनी दारूच्या दुकानाबाहेर सहा फूट अंतर ठेवून रांग लावावी, अशी अटही मोदी सरकारनं घातली आहे. वाइन शॉप्स आणि पानाच्या दुकानांसमोर सहा फुटांचं अंतर बंधनकारक करण्यात आलं असून, सोमवारपासून दुकानं उघडण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने दारूची दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी म्हणजेच 4 मेपासून 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्याच दरम्यान केंद्र सरकारनं ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप आणि पानाची गादी सुरू करण्यास अटी अन् शर्थींवर मान्यता दिली आहे.
कोरोना साथ व लॉकडाऊन संदर्भातील देशातील स्थितीचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये आढावा घेण्यात आला. लागू केलेल्या निर्बंधामुळे कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात नक्कीच यश मिळाले असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे ४ मेपासून लागू होतील. त्यानुसार काही जिल्ह्यांतील निर्बंध शिथील केले जातील. त्याची घोषणा येत्या काही दिवसांत होईल, असे केंद्रीय गृह विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे.