बंंगळुरू : भारताला कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावे लागेल आणि लॉकडाऊन हटवावा लागेल. याचे कारण लॉकडाऊन हटवला नाही तर कोरोनामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील, असे स्पष्ट प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी केले आहे.ते एका उद्योगपतींच्या वेबिनारला मुख्य अतिथी म्हणून संबोधित करत होते. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर भारतात लोकसंख्येच्या पाव ते अर्धा टक्का आहे. याउलट ६.६० कोटी लोकसंखा असलेल्या इंग्लंडसारख्या देशात १४,००० बळी कोरोनाने घेतले आहेत, असे मूर्ती यांनी सांगितले. लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढला असला तरी आतापर्यंत भारताने कोरोना संक्रमितांची संख्या मर्यादित ठेवली आहे व कोरोनाचा आलेख वर जाऊ दिलेला नाही. ३० जानेवारीला कोरोनाच्या पहिला रुग्ण आढळल्यापासून आजवर फक्त ३१ हजार लोक संक्रमित झाले व त्यापैकी १००७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, याकडेही मूर्ती यांनी लक्ष वेधले.कोरोनाबाधितांची तपासणी (टेस्टिंग) करण्याचे काम भारतात खूपच धीम्या गतीने सुरू आहे. याबाबत चिंता व्यक्त करून मूर्ती म्हणाले, यापुढे आपण कोरोना विषाणूसोबत जगायला शिकले पाहिजे. भारतातील उद्योजकांनी कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी कल्पक साधनांचा उपयोग केला पाहिजे, असे आवाहन मूर्ती यांनी केले.>देशात लाखो लोक बेरोजगार होण्याची भीतीदेशात दरवर्षी ९0 लाख लोक नैसर्गिकरीत्या मृत्यू पावतात. त्यापैकी २५ टक्के केवळ प्रदूषणामुळे मरतात. या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे गेल्या जवळपास दोन महिन्यात फक्त १००७ मृत्यू झाले. यावरून कोरोना तेवढा भयावह नाही हेच सिद्ध होते, असेही मूर्ती म्हणाले. १९ कोटी व्यक्ती देशात असंघटित क्षेत्रात काम करतात किंवा स्वयंरोजगाराद्वारे उपजीविका चालवतात. लॉकडाऊनमुळे या सर्व लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. लॉकडाऊन पुढेही सुरू राहिला तर अजून लाखो व्यक्ती बेरोजगार होतील, असेही मूर्ती म्हणाले.
CoronaVirus News: लॉकडाऊन हटवा अन् कोरोनासोबत जगायला शिका; नारायण मूर्ती यांचं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 4:15 AM