नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे १३ हजार ५९६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ४० लाखांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ८९ हजारांपर्यंत खाली घसरली असून गेल्या २२१ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे १६६ जणांचा बळी गेला असून मृतांची संख्या ४ लाख ५२ हजार २९० झाली आहे. मागील चोवीस दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचे दररोज आढळणारे प्रमाण ३० हजारांपेक्षा कमी आहे. तर गेल्या सलग ११३ दिवसांत रोज कोरोनाचे ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण सापडत आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचार घेत असलेले रुग्ण ०.५६ टक्के आहेत. कोरोनातून आजवर ९८.१२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी नव्या रुग्णांच्या संख्येत ६,१५२ जणांची घट झाली. देशात ३ कोटी ४० लाख ८१ हजार ३१५ कोरोना रुग्ण असून त्यातील ३ कोटी ३४ लाख ३९ हजार ३३१ जण बरे झाले. कोरोनाचा दररोजचा संसर्ग दर १.३७ टक्के असून मागील ४९ दिवसांत तो तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाचा आठवड्याचा संसर्ग दर १.३७ टक्के असून तो सलग ११५ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.३३ टक्के आहे. देशभरात आतापर्यंत कोरोना लसींचे ९८ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले. तर ५९ कोटी १९ लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. जगभरात कोरोनाचे २४ कोटी रुग्णजगभरात कोरोनाचे २४ कोटी १५ लाख रुग्ण आहेत. त्यातील २१ कोेटी ८७ लाख जण बरे झाले व ४९ लाख लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिकेत ४ कोटी ५७ लाख रुग्ण असून ३ कोटी ५३ लाख जण या संसर्गातून बरे झाले. अमेरिकेत कोरोनामुळे ७ लाख ४४ हजार, ब्राझिलमध्ये ६ लाख ३ हजार जणांचा मृत्यू झाला.
CoronaVirus News: देशात २२१ दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:11 AM