नवी दिल्ली : भारताने सोमवारी कोविड-१९ च्या ३० लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला व रोज एक लाख चाचण्या करण्याची क्षमता दाखवली. भारताने सोमवार सकाळी नऊवाजेपर्यंत ३०.३३ लाख चाचण्या केल्या होत्या व कोविड-१९ रुग्णांच्या संख्येने ६९७७ असा विक्रमी आकडा गाठला व एका दिवसात १५४ मृत्यू नोंदले.
महाराष्ट्र व तमिळनाडूने देशात अनुक्रमे ३.३२ व ३.८५ लाख चाचण्या करून वरचे स्थान मिळवले. बिहारमध्ये फक्त ५३१७५ तर उत्तर प्रदेशात २.१४ लाख चाचण्या झाल्या. या दोन्ही राज्यांत चाचण्यांची क्षमता वाढत आहे. अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्ली दर दहा लाख लोकसंख्येमागे ८२११ चाचण्या करून वरच्या स्थानी आहे तर महाराष्ट्रात हीच संख्या २७०१ आहे. बिहार दर १० लाखांमागे देशात चाचण्यांत सरासरी ४३८ तर उत्तर प्रदेश ९३९ पायरीवर आहे.
चाचण्यांचे प्रमाण जास्त असूनही तज्ज्ञांना चिंता आहे ती पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होत नसल्याचे. ते प्रमाण २४ मेपर्यंत ४.४ टक्के होते. दुसरे म्हणजे भारतात १६ मेपर्यंत रुग्ण संख्येचा कळस गाठला जाणार होता तो आता जूनअखेर असेल. कित्येक दशलक्ष स्थलांतरित कामगार/मजूर आपापल्या राज्यांत स्थिरावत आहेत. ग्रामीण भागांत चाचण्यांचे मोठे आव्हान आहे. पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या (आरोग्य) सदस्याने नाव न सांगण्याच्या अटींवर म्हटले की, महानगरांबाहेर असलेल्या गावांमध्ये चाचण्यांचे आव्हान आहे ते प्रशिक्षित कर्मचारी व चाचण्यांसाठी आवश्यक परिस्थितीचा अभाव असल्यामुळे. भारतातील मृत्यूदरदेखील वाढल्याचे दिसते भलेही तो सध्या तीन टक्क्यांच्या खाली आहे.