नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यासंबंधी सर्व माहिती देणारे आरोग्य सेतू अॅप तयार केले आहे. मात्र, फ्रान्समधील हॅकर Robert Baptiste ने एक ट्विट करून आरोग्य सेतू अॅपवरून भारतीयांची माहिती उघड होण्याचा दावा केला आहे. त्यामुळे आरोग्य सेतू अॅपबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, आरोग्य सेतू अॅप हे भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले. तसेच, हे अॅप खासगी संरक्षण, सुरक्षा आणि डेटा सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्णपणे मजबूत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
फ्रान्समधील हॅकर Robert Baptiste ने मंगळवारी 9 कोटी भारतीयांची माहिती उघड होण्याचा धोका आहे, असे ट्विट केले होते. तसेच, या हॅकर्सने आरोग्य सेतू अॅपवरुन खासगी माहिती कशाप्रकारे उघड होते, याबाबत स्पष्ट केले नाही. मात्र, यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून कोरोनासंदर्भातील सर्व माहिती देणारे आरोग्य सेतू अॅप सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य सेतू अॅपला केंद्र सरकारने लाँच केले आहे. हे अॅप सरकारचे अधिकृत कोविड-१९ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप आहे. या अॅपला इन्फॉर्मेटिक्स सेंटरने विकसित केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य सेतू अॅपवर कोरोना संदर्भात माहिती अपडेट करण्यात येते.