हैदराबाद : तेलंगणामध्ये कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग सुरू झाला असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नागरिकांनी चार ते सहा आठवडे अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आरोग्य खात्याने म्हटले आहे की, तेलंगणामध्ये कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढू शकते. कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न राज्य सरकार करत आहे. या प्रयत्नांना लोकांनीही साथ द्यायला हवी.
तेलंगणामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारांवर गेली असून ४३८ लोकांचा बळी गेला आहे. २०१८-१९ या वर्षीच्या वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात एक वर्ष सेवा बजावणे आहे. संसर्गाचे प्रमाण आणखी वाढत असून ही स्थिती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
विद्यार्थ्यांनाही बाधा
तेलंगणाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. के. रमेश रेड्डी यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये एक वर्ष सेवा बजाविण्यासाठी तत्काळ संपर्क साधावा. त्यासाठी प्राचार्यांनी तशा सूचना या विद्यार्थ्यांना द्याव्यात. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी डॉक्टरांचे संख्याबळ तोकडे पडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.