नवी दिल्ली : देशभरात गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ४५७७० नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. तसेच या दिवशी १२२९ जणांचा मृत्यू झाला असून ही देखील सर्वाधिक वाढ आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता १२ लाख ३८ हजारांपेक्षा अधिक झाली असून मृत्यूचा आकडा २९,८६१ वर गेला आहे.
कोरोना रुग्णांची ११ लाख असलेली संख्या केवळ तीन दिवसांतच १२ लाखांहून अधिक झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे १२,३८६३५ रुग्ण आहेत. दुसऱ्या बाजूला दिलासादायक बाब ही की, कोरोनाच्या संसगार्तून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या आता ७,८२,६०६ झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, सध्या ४,२६,१६७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.१८ टक्के आहे. देशात गुरुवारी कोरोनामुळे १,२२९ जणांचा मृत्यू झाला. याआधी एका दिवसात इतके मृत्यू कधीही झाले नव्हते. महाराष्ट्रामध्ये गुरुवारी कोरोनाचे १०,५७६ नवे रुग्ण आढळून आले असून तेथील एकूण रुग्णांची संख्या ३,३७६०७ झाली आहे. त्यातील १८७७६९ आजारातून पूर्णपणे बरे झाले असून १३७२८२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण अधिक आहे ही दिलासा देणारी गोष्ट आहे. देशात गुरुवारी महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले त्यात आंध्र प्रदेशमध्ये ६०४५, तमिळनाडू ५८४९, कर्नाटक ४७६४, उत्तर प्रदेशमध्ये २,३०० रुग्णांचा समावेश होता.
चाचण्यांची एकूण संख्या दीड कोटीहून अधिक
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने सांगितले की, देशात बुधवारी कोरोनाच्या 350823 चाचण्या पार पडल्या. त्यामुळे आता या चाचण्यांची एकूण संख्या दीड कोटींपेक्षा अधिक झाली आहे.