नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या चोवीस तासांत साडेतीन लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले तसेच २८१२ जण मरण पावले आहेत. कोरोनामुळे एका दिवसात बळी गेलेल्यांचा हा आजवरचा उच्चांक आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७३ लाख झाली असून, त्यातील १ कोटी ४३ लाख जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे देशात बळी गेलेल्यांची एकूण संख्या १ लाख ९५ हजार झाली आहे. सोमवारी देशात कोरोनाचे २ लाख १९ हजार रुग्ण बरे झाले. देशात सलग पाचव्या दिवशी ३ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत.
कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मात्र अद्यापही १.१३ टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८२.६ टक्के आहे. देशामध्ये २८ लाख रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या १६.२५ टक्के आहे. आतापर्यंत २७ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या तर १४ कोटी ११ लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली.
१८ ते २५ एप्रिलमध्ये देशात २२ लाख नवे रुग्ण
देशात १८ ते २५ एप्रिल या काळात २२ लाख ४९ हजार नवे रुग्ण वाढले तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाखांहून अधिक झाली. तसेच या कालावधीत कोरोनामुळे १६ हजार जणांचा बळी गेला आहे. या आठवड्यात देशात इतके रुग्ण वाढले की तो विश्वविक्रमच झाला.
भारताला सर्व मदत करणार : बायडेन
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविलेला असून त्यावर मात करण्यासाठी भारताला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन व उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी दिले आहे.