नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ नवे रुग्ण आढळले. शनिवारी जगातील इतर देशांपेक्षा भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. या दिवशी कोरोनामुळे २६२४ जणांचा मृत्यू झाला तसेच २ लाख १९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ६६ लाख झाली असून, त्यातील १ कोटी ३८ लाख जण बरे झाले. या संसर्गाने आतापर्यंत १ लाख ८९ लाख जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २५ लाख ५२ हजार इतकी आहे. काही आठवड्यांमध्ये भारतीय रेल्वेचे ९३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे.
जगभरात कोरोनाचे १४ कोटी ६२ लाख रुग्ण असून, त्यातील १२ कोटी ४१ लाख लोक बरे झाले आहेत. या संसर्गामुळे आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २७ लाख कोरोना रुग्ण असून, त्यापैकी २ कोटी ५२ लाख लोक बरे झाले व ५ लाख ८५ हजार लोकांचा बळी गेला. या देशात सध्या ६८ लाख कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या ३ लाख ८६ हजार आहे. बळींची ही संख्या भारतापेक्षा अधिक आहे.
आतापर्यंत १३ कोटी ८३ लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सैन्यदलातील १५.५ लाख जणांना पहिला डोस दिला असून त्यात या दलांतील १ लाख आरोग्यसेवकही आहेत. सैन्यदलांतील ११.७ लाख लोकांना कोरोना लसीचा दुसराही डोस देण्यात आला.