नवी दिल्ली - जगातील सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या धास्तीने एका कुटुंबाने आपल्याच नातेवाईकाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणात ही भयंकर घटना समोर आली आहे. कामारेड्डी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नातेवाईकांनी रुग्णालयातून मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर एका मुस्लिम तरुणाने या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. तेव्हा एका मुस्लिम तरुणाने त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचं भीषण वास्तव! स्मशानभूमीत जागाच मिळेना; पार्किंगमध्ये 15 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार
कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीत हे धक्कादायक चित्र पाहायला मिळालं आहे. पार्किंगमध्येच आतापर्यंत पंधरा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत मृतदेह जळत असल्यानं स्मशानभूमीमधील फरशी आणि प्लेटदेखील खराब झाल्या आहेत.
पूर्व दिल्लीतील पाच स्मशानभूमीपैकी सीमापुरी स्मशानात परिस्थिती सर्वात वाईट आहे. कोविडसाठीचे 12 प्लॅटफॉर्मही कमी पडत असल्याचं चित्र आहे. याच कारणामुळे स्मशानभूमीजवळ असणाऱ्या दिल्ली महानगरपालिकेच्या पार्किंगच्या जागेवर लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ज्योत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या आधी याठिकाणी लहान मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र पाच वर्षांपूर्वी येथे मुलांवर अंत्यसंस्कार करणं बंद करण्यात आलं होतं.