नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात देशात दररोज ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोना उपचारांत वापरला जाणारा नेझल स्प्रे लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे.
नेझल स्प्रेसाठी भारतीय कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सनं कॅनडियन कंपनी सॅनोटाईझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसोबत सोमवारी करार केला आहे. ही कंपनी भारतासोबतच सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, तैवान, नेपाळ, ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंकेसह आशियातील अनेक देशांना नेझल स्प्रेचा पुरवठा करणार आहे. 'नेझल स्प्रेच्या पुरवठ्यामुळे आशियाई देशांवरील संक्रमणाचा दबाव कमी होईल. संपूर्ण आशियात लवकरात लवकर नेढल स्प्रे उपलब्ध होईल,' असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सल्दानहा यांनी व्यक्त केला.
नेझल स्प्रेच्या चाचण्यांमध्ये काय आढळलं?कॅनडाच्या सॅनोटाईजनं नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रेची (एनओएनएस) निर्मिती केली आहे. हा स्प्रे रुग्णांना स्वत:च्या नाकात फवारायचा असतो. त्यामुळे नाकातील व्हायरल लोड कमी होतो. यामुळे विषाणूचा खात्मा होतो. तो फुफ्फुसापर्यंत पोहोचून नुकसान करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
कॅनडा आणि ब्रिटनमध्ये स्प्रेची चाचणी झालेली आहे. चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात ७९ रुग्णांचा समावेश होता. नेझल स्प्रेनं २४ तासांत व्हायरल लोड ९५ टक्क्यांनी कमी केला. ७२ तासांत व्हायरल लोड ९९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात स्प्रेला यश आलं. कोरोनाच्या युके व्हेरिएंटविरोधातही हा स्प्रे प्रभावी ठरला.
कॅनडात दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीत १०३ जणांचा सहभाग होता. त्यात कोणीही कोविड पॉझिटिव्ह आढळून आलं. युकेतील चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात ७० जणांचा सहभाग होता. हे सगळे कोविडबाधित होते. ज्यांच्या नाकात स्प्रे करण्यात आला, त्यांच्या तुलनेत अन्य व्यक्तींमध्ये १६ पट अधिक व्हायरल लोड आढळून आला. याआधी कॅनडात झालेल्या चाचण्यांमध्ये ७ हजार रुग्णांचा सहभाग होता. त्यातल्या कोणालाही गंभीर स्वरुपाची लक्षणं आढळून आली नव्हती.