नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. मात्र अधूनमधून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चिंता कायम आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी वाढली आहे. पर्यटनस्थळीदेखील पर्यटक मोठ्या संख्येनं जाऊ लागले आहेत. याबद्दल केंद्र सरकारनं स्पष्ट शब्दांत चिंता व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमधून सवलत दिली जात असताना अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसत आहे. मंडया, बस स्थानकांसह पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. सध्या दिसत असलेल्या बेजबाबदारपणामुळे तिसरी लाट येऊ शकते आणि समस्या वाढू शकतात, असा धोक्याचा इशारा केंद्रीय सचिवांनी पत्रातून दिला आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळले जातील याची काळजी घेण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या आहेत.
बुधवारी केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून काळजी घेण्याचे आणि नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. 'डोंगराळ भागातील पर्यटनस्थळांवर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. त्या ठिकाणी नियम पाळले जातील याची काळजी घ्या. नियमांचं उल्लंघन होत असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा,' अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.