नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दिल्लीतील सर्व सरकारी सॅप्मल कलेक्शन सेंटरमध्ये (नमुना संकलन केंद्र) रॅपिड अँटिजन टेस्ट आणि RT-PCR टेस्टसाठी सॅम्पल देण्यासाठी येणाऱ्या लोकांची ऑक्सिजन सेचुरेशन लेव्हल चेक करणे अनिवार्य असणार आहे. यासंदर्भातील आदेश दिल्ली सरकारने जारी केला आहे. हा तत्काळ लागू करण्यात येणार आहे.
या आदेशानुसार, रेपिड अँटिजन टेस्टिंग सेंटर्स आणि RT-PCR सॅम्पल कलेक्शन सेंटरवर टेस्ट करणाऱ्या किंवा सॅम्पल देण्यासाठी येणाऱ्या सर्व लोकांची ऑक्सिजन सेचुरेशन लेव्हल चेक करणे आणि ती ओपीडी स्लिपमध्ये लिहिणे अनिवार्य असणार आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या ऑक्सिजन सेचुरेशन लेव्हल 94% पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला टेस्टसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
दिल्ली सरकारच्या मते, कोरोनाचा मध्यम धोका असलेल्या लोकांना ओळखून त्यांच्यावर योग्यवेळी योग्य उपचार केल्यास त्यांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्यात मदत होईल. तसेच, या कोरोनामुळे मृत्यूदर कमी होईल. गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोरोनामुळे अचानक मृतांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत 1 ते 9 नोव्हेंबर या काळात कोरोनामुळे 581 लोकांचा मृत्यू झाला तर दिल्लीत 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 1124 होती.
ऑक्टोबरच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मृत्यू काही कमी झाले. 1 ते 30 सप्टेंबर या काळात दिल्लीत कोरोनामुळे 917 जणांना आपला जीव गमवावा लागला. सप्टेंबरच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा कमी होता. दिल्लीत कोरोनामुळे 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान 458 जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, दिल्ली आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी (दि.10) कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झाले आहे. एका दिवसात एकूण नवीन प्रकरणांची संख्या 7 हजार 830 इतकी झाली आहे. सणासुदीचा कालावधी आणि वाढत्या प्रदूषणामुळे कोरोना रुग्णांच्या दर 13.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे 4 लाख 94 हजार 657 रुग्ण सक्रिय आहेत. तर या आजारापासून बरे होणाऱ्यांची संख्या 80 लाख 13 हजार 783 आहे. देशात आतापर्यंत एकूण 86 लाख 36 हजार 012 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 44, 281 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे, तर 512 जणांचा मृत्यू झाला आहे.