नवी दिल्ली: आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉन असं नाव दिलं आहे. हा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्यानं सगळ्याच देशांनी धास्ती घेतली आहे. या व्हेरिएंटबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी संसदेत महत्त्वाची माहिती दिली.
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं मांडविय यांनी राज्यसभेत सांगितलं. नवा व्हेरिएंट आतापर्यंत १४ देशांमध्ये सापडला आहे. मात्र भारतात या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती मांडविय यांनी दिली. केंद्र सरकार संपूर्ण काळजी घेत असून जिनॉम सिक्वन्सिंग करत असल्याचं त्यांनी सांगितलं.ओमायक्रॉन व्हेरिएंट संदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये ओमायक्रॉनची लक्षणं आढळून आल्यास त्याची त्वरित चाचणी करण्यात येत आहे. जिनॉम सिक्वन्सिंगचं कामदेखील सुरू आहे, अशी माहिती प्रश्नोतराच्या कालावधीत मांडविय यांनी दिली.ओमायक्रॉनची लक्षणं काय?आतापर्यंत ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून आली असल्याची माहिती डॉ. एँजेलिक कोएत्जी यांनी दिली. डॉक्टर एँजेलिक कोएत्जी यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंट शोधून काढला आहे. ओमायक्रॉनची लक्षणं सर्वप्रथम एका ३० वर्षीय तरुणामध्ये आढळून आल्याचं कोएत्जी यांनी सांगितलं. त्याला प्रचंड थकवा जाणवत होता. त्याला काही प्रमाणात डोकेदुखीचा त्रास होता. संपूर्ण शरीरात वेदना जाणवत होत्या, अशी माहिती कोएत्जी यांनी दिली.याआधी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना घशात खवखव जाणवायची. मात्र ओमायक्रॉनची लागण झालेल्याना ती समस्या जाणवत नाहीए. या रुग्णांना खोकल्याचा त्रास होतोय. पण त्यांच्या तोंडाची चव गेलेली नाही. वास घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम झालेला नाही, असं डॉ. कोएत्जी यांनी सांगितलं. ओमायक्रॉनची लागण झालेल्या सुरुवातीच्या काही रुग्णांमध्ये या समस्या आढळून आल्या. मात्र या व्हेरिएंटची नेमकी लक्षणं जाणून घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांचा अभ्यास गरजेचा असल्याचं कोएत्जी म्हणाल्या. डॉक्टरांनी तपासलेल्या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्याच्या संपूर्ण कुटुंबालादेखील याच व्हेरिएंटची बाधा झाल्याचं चाचणीतून समोर आलं.