एस.के. गुप्तानवी दिल्ली : भारतात नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले की, नव्या स्ट्रेनमुळे चार रुग्ण समोर आले असून यामुळे स्ट्रेनने देशात संक्रमित झालेल्यांची संख्या २९ वर गेली आहे. मंगळवारपर्यंत देशात नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित झालेल्यांची संख्या सहा होती.
आतापर्यंत एकूण १०७ नमुन्यांचा अहवाल आला आहे. त्यात २९ ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित आहेत. २९ मध्ये सगळ्यात जास्त १० रुग्ण बंगळुरू आणि ८ पॉझिटिव्ह रुग्ण दिल्लीतील प्रयोगशाळेत आढळले आहेत. पुणे शहरात पाच संक्रमित सापडले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, नव्या स्ट्रेन विषाणूबाबत सरकारकडून राज्यांना कडक आदेश दिले गेले आहेत. याशिवाय जेथे कोठे म्यूटेंट विषाणूचे रुग्ण सापडतील त्यांना तेथेच क्वारंटाइन करण्यासोबत त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना शोधून विलगीकरणात पाठविले जात आहे.
नव्या स्ट्रेन विषाणूच्या संक्रमणावर नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, सध्या नव्या स्ट्रेनची साखळी लहान आहे. त्याबाबत काळजी घेतली जात आहे. त्याची बाधा झालेल्या लोकांना कठोर क्वारंटाइन नियमांअंतर्गत कंटेनमेंट झोन बनवून उपचार केले जात आहेत. त्यामुळे त्याचा फैलाव कमी होईल.
सुपर स्प्रेडरचा धोका
ब्रिटनमधून आलेला हा नवा स्ट्रेन कोरोना विषाणूच्या तुलनेत ७० टक्के जास्त वेगाने लोकांमध्ये पसरू शकतो. नवा स्ट्रेन सुपर स्प्रेडर आहे. म्हणून लोकांना आग्रह आहे की, नव्या वर्षाच्या पार्ट्यांपासून दूर राहा. कारण धोका टळलेला नाही. जास्त संख्येत एकत्र आल्यास सुपर स्प्रेडरचा धोका आहे, असे या अधिकाऱ्यानी सांगितले.