नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील रुग्णांचा आकडा ६७ लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी (७ ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७२ हजार ४९ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६७ लाख ५७ हजारांवर पोहोचली. आतापर्यंत १ लाख ४ हजार ५५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ८१ हजार ९४५ रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५७ लाख ४४ हजार ६९४ लोक बरे झाले आहेत. देशात सध्या ९ लाख ७ हजार ८८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
८ राज्यांतील ५५ जिल्ह्यांत ४८ टक्के रुग्णांचा मृत्यूकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत देशात ८ राज्यांतील २५ जिल्ह्यात ४८ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये १५ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. २ कर्नाटक, २ पश्चिम बंगाल, २ गुजरात, १-१ जिल्हे पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मृत्यू दर १ % पेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षणेविरहित रुग्ण; केवळ एक टक्का गंभीर अवस्थेतमहाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब असली, तरी १४ लाख ४२ हजार ९६८ कोरोनाग्रस्तांपैकी तब्बल २ लाख ३१ हजार ५२८ रुग्ण एकही लक्षण नसलेले आणि सौम्य लक्षण असलेले आहेत. ज्याचे प्रमाण १६ टक्के आहे.नराज्यात ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण म्हणजे एकूण ८० टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात फक्त एक टक्का म्हणजे ९,७५७ गंभीर रुग्ण आहेत. दरम्यान, १३,९९६ एवढे रुग्ण आयसीयू बाहेरील असून, ऑक्सिजनवर आहेत. त्यांचेही प्रमाण १ टक्का आहे, तर आतापर्यंत ३८,०८४ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला असून, राज्यातील मृत्युदर या आकडेवारीनुसार २ टक्के आहे. राज्यात २ लाख ५८ हजार १०८ रुग्ण सक्रिय आहेत. त्यातही लक्षण नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या, तसेच बरे होत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ९१ टक्के आहे. गंभीर रुग्णांची संख्या १३,९९६ असून, हे प्रमाण ५ टक्के आहे. आयसीयूबाहेर पण ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचे प्रमाण ४ टक्के आहे.
निवासस्थानीच विलगीकरणाचा सल्लामागील काही दिवसांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या किंवा पॉझिटिव्ह असूनही कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण संसर्ग पसरविण्यासाठी सक्रिय असतात का, यावरही ठोस अभ्यास सुरू असून, हे रुग्ण काही प्रमाणात संसर्ग पसरवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या घरी संबंधित सुविधा असल्यास निवासस्थानीच विलग राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.