नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील रुग्णांचा आकडा ७० लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (११ ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७४ हजार ३८३ नवे रुग्ण आढळून आले. तर ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७० लाख ५३ हजारांवर पोहोचली. देशात आतापर्यंत १ लाख ८ हजार ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ६० लाख ७७ हजार ९७७ लोक बरे झाले आहेत. देशात सध्या ८ लाख ६७ हजार ८९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १० लाख ७८ हजार ५४४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
अमेरिकेमध्ये ७८.९४ लाख रुग्ण जगभरातील रुग्णसंख्या ०३.७१ कोटींपेक्षा अधिक झाली. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर अमेरिकेमध्ये ७८.९४ लाख रुग्ण आहेत. दुस-या क्रमांकावरील भारतामधील रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा ०९.०० लाखांनी कमी आहे, तर तिस-या स्थानावरील ब्राझीलमध्ये ५०.५७ लाख रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेराज्यात मागील काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात शनिवारी २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी झाले, तर आतापर्यंत १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात २ लाख २१ हजार १५६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.