नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14,148 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 512924 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने आता चिंतेत भर टाकली आहे. तो वेगाने पसरत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच दरम्यान भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (CJI N V Ramana) यांनी कोरोनाचा ओमायक्रॉन व्हायरस (Omicron Variant) हा सायलेंट किलर असल्याचं म्हटलं आहे.
दुसऱ्या लाटेत झालेल्या कोरोना संसर्गानंतर 25 दिवसांचा अनुभव सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी पूर्ण क्षमतेने प्रत्यक्ष हजर राहत सुनावणीस सुरुवात करण्याची विनंती केली. यावर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी हे मत व्यक्त केलं आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी ऑफलाईन सुनावणीची मागणी केली. यावर सरन्यायाधीश रमणा यांनी दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या 15000 वर पोहचल्याचं सांगितलं. यावर सिंह यांनी हा कोरोनाचा ओमायक्रॉन व्हायरस असून तो सौम्य असल्याचं म्हटलं.
"गेल्या 25 दिवसांपासून मी सातत्याने त्याचे परिणाम भोगत आहे"
"ओमायक्रॉन हा सायलंट किलर आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मला संसर्ग झाला, मात्र मी 4 दिवसांमध्येच बरा झालो. आता दुसऱ्या लाटेत मला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हायरसचा संसर्ग झाला. गेल्या 25 दिवसांपासून मी सातत्याने त्याचे परिणाम भोगत आहे" असं सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटनेसयाबाबतचे वृत्त दिले आहे. ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 बाबत विविध प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारातील BA.2 हा सब-व्हेरिएंट हा Omicron या मूळ प्रकारापेक्षा वेगाने पसरत असल्याचं म्हटलं जात आहे. भारताचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि राष्ट्रीय IMA कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. BA.2 सब-व्हेरिएंटमधून दुसरी लाट अपेक्षित नाही असं म्हटलं आहे.
ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 मुळे येणार कोरोनाची आणखी एक लाट?; तज्ज्ञ म्हणतात...
ज्या लोकांना आधीच BA.1 सब-व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे त्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकत नाही असंही सांगितलं. तसेच BA.2 हा व्हायरसही नाही किंवा नवा स्ट्रेन देखील नसल्याचं म्हटलं आहे. BA.1 सब-व्हेरिएंटपेक्षा अधिक संक्रमणीय आहे. म्हणजेच ते खूप वेगाने पसरू शकते. पण यामुळे दुसरी लाट येणार नाही. राजीव यांचे हे विधान प्रख्यात एपिडेमियोलॉजिस्ट डॉ एरिक फीगल-डिंग यांच्या इशाऱ्यानंतर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) त्यांनी BA.2 सब व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित करण्यास सांगितलं. एरिक यांनी BA.2 सब व्हेरिएंटने गंभीर रोग होण्याची क्षमता आहे असं म्हटलं होतं. जपानमध्ये केलेल्या प्रयोगशाळेतील प्रयोगांचा हवाला देत डॉ. एरिक यांनी असेही सांगितले की BA.2 सब व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा प्रकाराइतकाच धोकादायक असू शकतो.