नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. शुक्रवारी २०,०३५ नवे रुग्ण आढळले. या आजारातून आतापर्यंत ९८.८३ लाख जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.०८ टक्के आहे. सलग अकराव्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २३, १८१ जण या संसर्गातून बरे झाले. कोरोनामुक्त झालेल्यांची आजवरची संख्या ९८,८३,४६१ असून एकूण रुग्णसंख्या १,०२,८६,७०९ आहे. या आजाराने शुक्रवारी २५६ जण मरण पावले. त्यामुळे बळींची एकूण संख्या १,४८,९९४ झाली. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४५ टक्के आहे.
सध्या २,५४,२५४ सक्रिय रुग्ण असून, त्यांचे प्रमाण २.४७ टक्के आहे. जगभरात ८ कोटी ३८ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ५ कोटी ९३ लाख लोक बरे झाले व १८ लाखांहून अधिक जणांचा बळी गेला. भारतामध्ये कोरोना बळी व सक्रिय रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे.
कॅलिफोर्नियात २५ हजारांवर बळी
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कोरोना बळींची संख्या २५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. अमेरिकेत २ कोटी ४ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १ कोटी २१ लाख जण बरे झाले. त्या देशात ७९ लाख सक्रिय रुग्ण असून, ३ लाख ५४ हजार जणांचा बळी गेला.