नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आता पार्लर सुरू करण्यात आले आहेत.
देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असताना केरळमध्ये ऑक्सिजन पार्लरची अनोखी शक्कल लढवण्यात आली असून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. कोट्टायम जिल्हा प्रशासन संपूर्ण जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजन पार्लर्स उघडणार आहेत. मानरकद येथील सेंट मेरी चर्च ऑडिटोरियममधल्या कोविड केअर सेंटरमध्ये अशा एका ऑक्सिजन पार्लरचं (Oxygen Parlour) उद्घाटन करण्यात आलं आहे. हा केरळमधील पहिलाच उपक्रम आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी ज्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. ते रुग्ण रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी (Blood Oxygen Level) तपासू शकतात आणि त्यांना गरज असेल तर ऑक्सिजन पार्लरमधून त्यांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी एम. अंजना यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शिल्पा देविया यांच्या उपस्थितीत मानरकद येथील ऑक्सिजन पार्लरचं उद्घाटन केलं. ज्या भागात सर्वाधिक रुग्ण घरी आहेत, अशी ठिकाणं पाहून त्या भागांमध्ये ऑक्सिजन पार्लर्स उभारण्यात येत असल्याचं एम. अंजना यांनी सांगितलं. ऑक्सिजन पातळीत अचानक बदल झाला, तर उपचारांमध्ये होणारा उशीर टाळण्यास यामुळे मदत होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. घरीच उपचार घेत असलेले रुग्ण प्रोटोकॉल पाळून ऑक्सिजन पार्लरमध्ये येऊन ऑक्सिजन पातळी तपासून गरज असल्यास ऑक्सिजन मिळवू शकतात. पार्लरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन (Oxygen Concentrator) आहे. जे प्रति मिनिटाला पाच लीटर इतका ऑक्सिजन पुरवू शकतं.
ऑक्सिजन पार्लरमध्ये आलेल्या रुग्णांनी दोन मिनिटं विश्रांती घेतल्यावर पल्स ऑक्सिमीटरच्या (Pulse Oxymeter) सहाय्याने त्यांच्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. ती 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तरच रुग्णांना या मशीनचा वापर करू दिला जातो. तिथल्या किऑस्कमध्ये असलेला ऑक्सिजन मास्क सॅनिटाइझ करून रुग्णांनी वापरायचा असतो. नाक आणि तोंड झाकेल अशा पद्धतीने मास्क लावून मग मशीन सुरू केली जाते. 10 मिनिटं ऑक्सिजन घेतल्यानंतर पुन्हा रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. ती 94 टक्क्यांच्या वर गेली असेल, तर रुग्णाला घरी पाठवलं जातं. दी न्यू इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.