नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत असला तरीही कोरोनामुक्त झालेल्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीमध्ये एका व्यक्तीला पाय गमवावा लागला आहे. योग्य वेळी ऑक्सिजन न मिळाल्यानं ही परिस्थिती ओढवली.
ऑक्सिजनचं प्रमाण घसरल्यानं पाय गमावलादिल्लीत वास्तव्यास असलेल्या ५१ वर्षीय विवेक बहल यांना मेमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांना ८ ते १० दिवस ताप आला होता. त्यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं टोक गाठल्यानं रुग्णालयांमधील बेड्स अपुरे पडत होते. त्यावेळी अनेक ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन कमी पडत होता. विवेक यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण ४० वर आलं. त्यांनी अनेक रुग्णालयांशी संपर्क केला. अखेर विवेक यांना गाझियाबादमधल्या इंदिरापुरम येथील एका गुरुद्वाऱ्यात ऑक्सिजन मिळाला.
ऑक्सिजन मिळाल्यानंतर विवेक यांची प्रकृती सुधारली. त्यानंतर त्यांना मॅक्स रुग्णालयात बेड मिळाला. मात्र तिथे पोहोचेपर्यंत त्यांचा उजवा पाय निळा पडला होता. रुग्णालयात ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. तेव्हा ती ७०-८० च्या दरम्यान होती. हा पाय कापण्याशिवाय पर्याय नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पाय पूर्ण काळा पडला होता. त्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. पायात निर्माण झालेल्या गुठळ्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्या होत्या.
विवेक यांच्या किडनीवरही परिणाम दिसू लागला होता. मॅक्स रुग्णालयाचे डॉक्टर सुनील चौधरींनी विवेक यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली. तर आशिष जैन यांनी औषधं देऊन त्यांच्या शरीरात असलेल्या रक्ताच्या गुठळ्या दूर करण्याचं काम केलं. फुफ्फुसात असलेल्या रक्ताच्या गुठळ्या औषधांमुळे दूर झाल्या. पण पाय वाचवणं अशक्य होतं. त्यामुळे डॉक्टरांनी विवेक यांचा पाय कापला.