नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लवकरच दिल्लीमध्ये प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. "आम्ही काही महिन्यांपूर्वी याची चाचणी सुरू केली होती आणि त्याचा परिणाम सकारात्मक आहे," अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
प्लाझ्मा चाचणीचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यामुळे राज्य सरकारने प्लाझ्मा बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील आयएलबीएस रुग्णालयात प्लाझ्मा बँक तयार करण्यात येईल. तसेच, कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "दिल्ली सरकारच्या प्लाझ्मा बँकेच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. याचा फायदा प्रत्येकाला मिळेल. सर्व रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना, मग सरकारी असोत किंवा खाजगी, याचा सर्वांना लाभ मिळेल. जर एखाद्यास प्लाझ्मा आवश्यक असेल तर डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच रुग्णाला प्लाझ्मा मिळू शकेल. तसेच, कोणालाही प्लाझ्मा वैयक्तिकरित्या मिळणार नाही. आयएलबीएस हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा बँक पुढील दोन दिवसांत सुरू केली जाईल."
याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोना संसर्गाच्या उपचारातून बरे झालेले रुग्ण आणि सामान्य लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्व लोकांनी पुढाकार घेणे, आवश्यक आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, बर्याच हॉस्पिटलमधील रूग्णांना प्लाझ्मा देण्याचे उदाहरण देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, या कामात सर्वांनी भाग घ्यावा.
आयएलबीएस रुग्णालय कोरोना रुग्णालय नाही, तरीही तेथे व्यवस्था करण्यात आली आहे. जर कोणाला प्लाझ्मा दान करायचे असेल तर त्यांनी सरकारला सांगावे. त्या व्यक्तीला आयएलबीएस रुग्णालयात पोहोचवण्याची सर्व जबाबदारी सरकार घेईल. यासाठी, एक किंवा दोन दिवसांत फोन नंबर जारी केले जातील. या क्रमांकावर कॉल केल्यावर, एक टॅक्सी आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला आयएलबीएस रुग्णालयात घेऊन जाईल, ज्याठिकाणी आपण प्लाझ्मा दान करण्यास सक्षम असाल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. याशिवाय, अधिकाधिक लोकांनी प्लाझ्मा दान करावे, जेणेकरुन कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यास मदत होईल, असे आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.