नवी दिल्ली/ मुंबई: देशातील कोरोना बाधितांची संख्या 14 लाखच्याही पुढे गेली आहे. रविवार आलेल्या नव्या आकडेवारी प्रमाणे देशात आतापर्यंत तब्बल 14 लाख 11 हजार 954 जणांना करोनाची लागण झाली आहे. covid19india.orgच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 4 लाख 77 हजार 228 सक्रिय रुग्ण आहेत. 9 लाख 01 हजार 959 जणांना रुग्णालयातून जिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 32 हजार 350 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. तसेच ३१ जुलैनंतर अनलॉक ३ चा टप्पा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबई, कोलकाता आणि नोएडामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उच्च क्षमता असलेल्या कोविड-19 लॅबचं उद्घाटन करणार असल्याची माहिती मिळत देखील समोर आली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य सचिवदेखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही सातवी संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत अनलॉक-२ नंतर पुढे काय? याविषयी विचार-विनिमय होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीत करोनाशी दोन हात करण्यासाठी यापुढे कशी तयारी असायला हवी? राज्याची आणि केंद्राची यासाठी काय रणनीती असायला हवी? याबद्दल चर्चा होणार आहे.
दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोना संक्रमण फैलावलेल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आज राज्यात एकूण ९६१५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत तर २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रविवारी तब्बल ५७१४ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५७ हजार ११७ वर पोहचलीय. यातील १ लाख ९९ हजार ९६७ जणांनी कोरोनावर मात केलीय तर १३ हजार १३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर मुंबईत सध्या २२ हजार ५३६ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात १५ हजार १२८ लक्षणविरहित तर ६ हजारांहून अधिक लक्षणे असलेले रुग्ण आहेत. १ हजार १९७ रुग्णांची स्थिती गंभीर आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७३ टक्के असून रुग्ण दुपटीचा दर ६७ दिवसांवर आला आहे. १९ जुलै ते २५ जुलैपर्यंत मुंबईतील कोरोना वाढीचा दर १.०३ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत रविवारी १,१०१ रुग्णांची नोंद झाली, तर ५७ मृत्यू झाले. या मृतांपैकीपाच रुग्णांचे वय ४० वर्षांच्या खाली होते. ३४ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. उर्वरित १८ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. दरम्यान शहर, उपनगरात ६३० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तसेच ६ हजार १८ सीलबंद इमारती आहेत.