नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या दोन कोटीवर पोहोचली आहे. याच दरम्यान 3 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हॅलट रुग्णालयामधील कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तींच्या नावावर अनेक दिवस औषध साठ्यामधील रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विकल्याची माहिती आता समोर आली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हव्यासापोटी ज्यांना या इंजेक्शनची गरज होती त्यांना हे इंजेक्शन रुग्णालयाकडे असूनही मिळालं नाही. कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टरांची चिठ्ठी असल्यावरच स्टोअर रुममधून रेमडेसिवीरसारखी औषधं दिली जातात. मात्र न्यूरो सायन्स विभागाने केलेल्या तपासामध्ये अनेक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नावे रेमडेसिवीर इंजेक्शन स्टोअरमधून घेऊन जाण्याचं आल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या नावाने आरोग्य कर्मचारी रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णालयाच्या औषध साठ्यामधून मिळवत होते.
धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर समोर येणाऱ्या माहितीमध्ये रुग्णालयातील अनेक मोठ्या डॉक्टरांचा यात समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 30 एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या टीमने हॅलटमधील दोन कर्मचाऱ्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर अमर उजालाने केलेल्या तपासामध्ये या रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संख्येमध्ये मोठा घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आली. समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीच्या आधारे कोरोना वॉर्डातील कर्मचारी आणि वॉर्ड बॉय रुग्णालयाच्या स्टोअरमधून मेलेल्या व्यक्तींच्या नावेही इंजेक्शन घ्यायचे. ही इंजेक्शन खूप नफा मिळवण्याचा हेतूने वाढीव दरात विकली गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यूरो सायन्स विभागाच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराची सगळी आकडेवारी काढली तर अनेक कर्मचाऱ्यांची नावं समोर येतील, असं म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये कानपुरमधील गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर. बी. कमल यांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रेमडेसिवीरच्या काळाबाजारासाठी मेलेल्या व्यक्तींच्या नावे दिलेल्या या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. एका समितीची स्थापना करण्यात आली असून सध्या या समितीकडून तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.