नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत अधूनमधून वाढ होत असल्यानं चिंता कायम आहे. त्यातच लवकरच तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आरोग्य विभाग अलर्टवर आहे. सध्याच्या घडीला देशात दररोज ५० हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र आता कोरोना चाचणीबद्दल एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. यामुळे डॉक्टरदेखील हैराण झाले आहेत.
कोरोनाची लागण झालेली असतानाही आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगळुरुत आतापर्यंत असे ८ प्रकार घडले आहेत. या आठही व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सीटी स्कॅनमधून त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं. या आठपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं असू शकतात. त्यामुळे सीटी स्कॅन केला जातो. त्यातून कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर कोरोना रुग्णांप्रमाणे उपचार केले जातात, असं कर्नाटकच्या कोविड-१९ टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी सांगितलं. राज्यात अशा प्रकारच्या ५ ते ८ टक्के केसेस आहेत. कोरोनाची लक्षणं असूनही आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यास पुन्हा चाचणी करून पाहावी, असा सल्ला त्यांनी दिला.
टेस्ट किटचा दर्जा बजावतो महत्त्वाची भूमिकाकोरोनाची लागण झालेली असतानाही आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येण्याचं प्रमाण १० ते १५ टक्के असल्याची माहिती डॉ. रघू यांनी दिली. आरटी-पीसीआरची चाचणीची अचूकता किटच्या दर्जावर अवलंबून असते. त्यामुळे लक्षणं असूनही आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येत असल्यास संबंधितांनी सिटी स्कॅन करावा, असं रघू यांनी सांगितलं.