नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 31 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,47,417 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने लॉकडाऊनची जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळेच आता लॉकडाऊनच्या भीतीने लोकांनी वस्तू खरेदीसाठी तुफान गर्दी केली आहे. बिस्किट, तेल, दारू, अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ, मास्क, सॅनिटायझर खरेदीसाठी लोकांची झुंबड पाहायला मिळत आहे. यामध्ये हैराण करणारी बाब म्हणजे यामध्ये सर्वाधिक विक्री ही दारूची झाली आहे. काही राज्यांमध्ये तर लोकांनी लॉकडाऊनची तयारी करताना दारूची खरेदी केल्याचं पाहायला मिळत आहे. तामिळनाडूमध्ये नाईट कर्फ्यू आणि रविवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.
210 कोटी रुपयांच्या दारूची रेकॉर्डब्रेक विक्री
लॉकडाऊनबाबत समजताच लोकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात दारूची खरेदी केली. त्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. एका दिवसात तब्बल 210 कोटी रुपयांच्या दारूची रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे. या रेक़ॉर्डमध्ये कांचीपुरम, चेंगलपत्तू आणि तिरुवल्लुवर या तीन जिल्ह्यांचं सर्वात जास्त म्हणजे 25 टक्के योगदान आहे. येथील लोकांनी एका दिवसात 52 कोटींची दारू खरेदी केली आहे. बिस्किटांच्या विक्रीतही 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. बिस्कीट आणि दारू व्यतिरिक्त खाद्य तेलाची देखील विक्री झाली आहे. लोकांना आता मोठ्या प्रमाणात आपल्या घरात तेलाचा देखील साठा केला आहे.
पॅकेज्ड फूड, डेअरी प्रोडक्ट, मास्क-सॅनिटायझरला अधिक पसंती
जीवनावश्यक गोष्टींसोबतच लोकांनी पॅकेज्ड फूड, डेअरी प्रोडक्ट, मास्क-सॅनिटायझरला अधिक पसंती दिली आहे. Blinkit ने दिलेल्या माहितीनुसार, या वस्तुच्या ऑर्डरमध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. दूध आणि अन्य वस्तुंची मागणी देखील 200 टक्क्यांनी वाढली आहे तर फ्रोजन फूड आणि मास्क, सॅनिटायझरसारख्या वस्तुंची मागणी 150 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. तर अनेक ठिकाणी कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.