नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरवरच अवलंबून न राहता, तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळी उपकरणे आणि वस्तूंचा शोध तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ लावत आहेत. त्यात आता कापड उद्योगातील प्रसिद्ध ब्रँड असलेल्या सियारामने अँटी-कोरोना कापडाची निर्मिती केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या लॅबमध्ये या कापडाची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. अँटी-कोरोना कापड हे विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. ते ९९.९४ टक्के प्रभावी ठरू शकतं.२५ वर्षांपासून आरोग्यसेवा क्षेत्रात कार्यरत असणारी ऑस्ट्रेलियाची कंपनी हेल्थगार्ड यांच्या सहकार्यार्ने हे कापड विकसित करण्यात आले आहे. आपले शरीर ९० टक्के कपड्यांनी झाकलेले असते. विषाणू कपड्यांवर बराच काळ राहतात आणि तिथूनच शरीरातही प्रवेश करू शकतात. ही बाब लक्षात घेऊनच, नैसर्गिक, उत्तम दर्जांचं आणि विघटनशील साहित्य वापरून हे कापड तयार करण्यात आले आहे. या कापडावरील प्रक्रिया केलेला थर पाण्यात विरघळणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
"कोरोनाची सद्यस्थिती पाहता आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे, तसेच येत्या काही दिवसांत भारतात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबत राहावे लागेल" अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत अँटी-कोरोना कापड हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमी प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे.
वैद्यकीय उपकरणे, साहित्यांसाठी आपल्याला चीनवरच अवलंबून रहावे लागत होते. यामुळे भारतातच हे किट बनविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. वाराणसीमध्ये डीआरडीओने पीपीई किट बनविण्यासाठी एका फॅक्टरीला मंजुरी दिली आहे. या फॅक्टरीमध्ये सात प्रकारची किट बनविण्यात आली होती. या सातही किटना डीआरडीओने निवडले असून बनविण्याची मंजुरीही दिली आहे. बनारसी साड्य़ा बनविणाऱ्या कारागिरांनीच हे किट तयार करत आहेत. देशात सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रामध्येच आहेत. त्याखालोखाल दिल्ली, तमिळनाडू व गुजरात यांचा क्रमांक लागतो. एकूण रुग्णांच्या तुलनेत तमिळनाडूचा मृत्युदर गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश यांच्यापेक्षा बराच कमी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४0७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात १ जूनपासून आतापर्यंत २ लाख ९९ हजार ८६६ म्हणजेच सुमारे तीन लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रोज १0 हजारांहून अधिक रुग्ण दिसून येत होते. तिसऱ्या आठवड्यांनंतर दरदिवशी १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आहे. पण आतापर्यंत १७ हजारांचा आकडा कधीच ओलांडला नव्हता. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या १ लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५८. २४ टक्के असून, मृत्युदर जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)