मुंबई : भरमसाठ चाचण्या आणि त्याची अवाजवी बिले यांनी गांजलेल्या रुग्णांच्या व्यथेला आता डॉक्टरांकडूनही आवाज मिळाला आहे. रुग्णांच्या लुटीचे मोठे जाळे मानल्या जाणाऱ्या या चाचण्यांवर राज्य सरकारने दरनिश्चितीचे बंंधन आणले होते. त्यालाही व्यावसायिकांनी विरोध केला. त्याचेच पडसाद कोरोनाच्या दोन लाटांमध्ये पडलेले दिसले. आधीच खचलेला रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांच्यावर मानसिक ताण निर्माण करणाऱ्या या बिनकामाच्या चाचण्यांवर भर दिला जातोय, असा दावा देशातील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. केंद्र आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणांनी या अनावश्यक उपचारपद्धती आणि चाचणीचा वापर थांबविला पाहिजे, अशी विनंती डॉक्टरांनी या पत्राद्वारे केली आहे. विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ३५ डॉक्टरांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. यातील ३५ डॉक्टरांपैकी डॉ.संजय नागराल यांनी सांगितले, कोविड उपचार, चाचणी आणि रुग्णालयात भरती करणे, यावर देशात अनावश्यक भर दिला जात आहे. सद्यस्थितीबाबत ही भूमिका सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या पत्राद्वारे करण्यात आला आहे.अमेरिकेतील हार्वर्ड आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील भारतीय वंशाच्या काही डॉक्टरांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या पत्रातील माहितीनुसार, २०२१च्या कोरोना लाटेतील काही चुकांची पुनरावृत्ती २०२२ मध्ये होत आहे. डॉक्टरांच्या चमूने तीन प्रमुख समस्या मांडल्या आहेत. अवास्तव औषधोपचार, अवाजवी चाचण्या आणि आवश्यकता नसतानाही रुग्णालयात भरती करणे, ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत. काही रुग्णांना तर औषधांचीही आवश्यकता नाही किंवा त्यांना किरकोळ औषधोपचारानंतर रुग्ण बरे होत आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.कुटुंबावरील आर्थिक ताण वाढतोय औषधांच्या अति वापरामुळे दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरचा उद्रेक झाला. बहुसंख्य रुग्णांची आधी रॅपिड अँटिजन टेस्ट, आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. यानंतर, संबंधित रुग्णांना फक्त विलगीकरण ठेवले, तरी पुरेसे आहे. मात्र, अशा रुग्णांनाही सीटी स्कॅन, तसेच महागड्या रक्तचाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. या महागड्या चाचण्या आणि गरज नसतानाही रुग्णालयात भरती केल्याने, कुटुंबांवरील आर्थिक बोजा वाढत असल्याची खंतही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
CoronaVirus News: बिनकामाच्या चाचण्या बंद करा; देशातील ३५ डॉक्टरांचे केंद्र-राज्य सरकारला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 7:46 AM