बरेली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाच्या ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका महिलेला अतिशय त्रास होताना दिसत आहे. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत आहेत. मात्र तरीही तिला रुग्णालयात जाऊ देण्यात येत नसल्याचं ती सांगत आहे.शहाजहानपूरमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातलं मतदान सुरू असताना शिक्षिका मतदान केंद्रात कर्तव्य बजावत होती. त्यावेळी तिची प्रकृती बिघडली. मात्र कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. त्यामुळे तिनं तिची व्यथा मांडणारा एक व्हिडीओ रेकॉर्ड करून शिक्षकांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर शेअर केला. तिथून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षिका फरशीवर झोपलेली दिसत आहे. तिला श्वास घेताना त्रास होत आहे. तिला सतत खोकला येत आहे. यामुळे तिला बोलणंही अवघड जात आहे. 'माझं नाव अपर्णा आहे. कलानमधील दसिया गावातील प्राथमिक शाळेत मला ड्युटी लावण्यात आली. माझी प्रकृती ठीक नाही. इथे कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध नाही. ते मला रुग्णालयातही जाऊन देत नाहीत. मला जबरदस्तीनं इथेच थांबवण्यात आलं आहे. मी काय करू? कृपया मदत करा,' अशी याचना शिक्षिकेनं व्हिडीओच्या माध्यमातून केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेची प्रकृती बिघडलेली असतानाही तिच्या समोरच मतदान सुरू होतं.अपर्णा महावार यांचं वय ४४ वर्ष असून त्यांना दोन मुलं आहेत. दसियामधील एका मतदान केंद्रावर त्यांची ड्युटी लावण्यात आली होती. प्रकृती ठिक नसल्यानं ड्युटी लावण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र त्यांचा विनंती अर्ज फेटाळून लावण्यात आला. मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना जवळपास दोन तासांनी वैद्यकीय मदत मिळाली. त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथली अवस्था अतिशय भीषण असल्यानं, रुग्णांना जमिनीवर झोपावं लागत असल्यानं अपर्णा यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.