पावसाळा सुरू झाल्यावर ताप आणि खोकला आल्यास हा नियमित ऋतूमानाप्रमाणे येणारा सर्दी खोकला की कोरोना हे निदान करणे अवघड जाईल. त्यामुळे सर्वांनी, त्यातच लहान मुलांनी आणि ज्यांना परवडत असेल त्यांनी फ्लू म्हणजे सर्दी खोकल्याची लस घेतलेली चांगली. या लसीचा एकच डोस घ्यावा लागतो. लस घेताना एक गोष्टीकडे लक्ष ठेवावे.
फ्लूची लस उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असते. भारतासाठी उत्तर ध्रुवासाठीची लस वापरावी, असे निर्देश आहेत. हे एनएच म्हणजे नॉर्दन हेमीस्फीअर असे लसीच्या पाकिटावर लिहिलेले असते. हे तपासून किंवा डॉक्टरला विचारून लस द्यावी. चुकीने बऱ्याच ठिकाणी एसएच म्हणजे दक्षिण ध्रुवाची लस वापरली जाते.
पण भारतीय नागरिकांसाठी या लसीचा उपयोग नाही. ही लस घेण्याचे दोन फायदे आहेत. नियमित होणारा सर्दी-खोकला टळेल. कुठल्या ही व्हायरल आजारानंतर प्रतिकारशक्ती कमी होते व अशावेळी कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. हा एक जोखीम वाढवणारा घटक कमी होईल.- अमोल अन्नदाते (लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)