चेन्नई : कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर झालेला फैलाव रोखण्यासाठी तामिळनाडू सरकारने चार जिल्ह्यांमध्ये अधिक कडक स्वरूपात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे चेन्नई शहरात सर्व रस्त्यांवर शुकशुकाट असून, सारे जनजीवन जणू ठप्प झाले आहे. औषधांची दुकाने, रुग्णालयेवगळता पेट्रोल पंपासहित इतर सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत.तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये रस्त्यांवर एखादेच दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाताना दिसून येत आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी दिवसभरात काही तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात येते. मात्र रविवारी तीही मुभा देण्यात आलेली नाही. चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू या चार जिल्ह्यांमध्ये १९ जून ते ३० जून या कालावधीत अतिशय कडक स्वरूपात लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या चार जिल्ह्यांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट बंद असून, राज्य सरकार संचालित अम्मा कॅटिन व अन्नधान्याचे मोफत वाटप मात्र सुरू राहणार आहे. पोलिसांनीही चेन्नईसहचार जिल्ह्यांमधील बंदोबस्तात वाढ केली आहे.>विनाकारण भटकणाऱ्यांवर गुन्हे दाखलजे विनाकारण घराबाहेर फिरताना आढळतील, त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. कोणतेही कारण नसताना भटकणाऱ्यांची वाहने चेन्नई पोलीस जप्त करत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत शेकडो वाहने पोलिसांनी चेन्नई शहराच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यांवर जप्त केली आहेत. या वाहनधारकांकडून दंड वसूल करून त्यांची वाहने काही दिवसांनी परत करण्यात येतील.
CoronaVirus News : लॉकडाऊन आणखी कडक केल्याने चेन्नईतील जनजीवन झाले ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 2:56 AM