नवी दिल्ली : जगभरातील आघाडीच्या औषध कंपन्या कोरोनावरील उपाय शोधण्यासाठी झटून प्रयत्न करीत आहेत. अशातच दैनंदिन उपयोगातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीत आघाडीवर असलेल्या बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपनेही कोरोनावरील औषधासाठी रीतसर परवानगी काढून क्लिनिकल ट्रायल सुरू केल्या आहेत, अशी माहिती दिली.
पतंजली ग्रुपचे कार्यकारी संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, आम्ही कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नव्हे, तर या आजारातून पूर्णपणे बरे होण्याच्या इलाजासाठी प्रयत्न करीत आहोत. सुरक्षेच्या उपाययोजना आणि परवानगीसह इंदूर आणि जयपूरमध्ये आम्ही मागच्या आठवड्यात क्लिनिकल ट्रायल सुरू केल्या आहेत. पतंजली ग्रुपची २०१९ मधील वार्षिक उलाढाल ८ हजार ५०० कोटींची आहे. देशभरात या ग्रुपचे ५० हजार कर्मचारी आहेत.
बेफाम विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा आणि उत्पादनांच्या दर्जामध्ये सातत्य राखण्यात आलेले अपयश यामुळे हा ग्रुप सातत्याने वादात अडकला आहे. अशात आता या ग्रुपने कोरोनावर औषध शोधण्याच्या कामात उडी घेणे मोठे धाडसाचे मानले जात आहे. आचार्य बाळकृष्ण यांच्या माहितीनुसार, ग्रुपने कोरोनावरील औषधाच्या चाचण्या फेब्रुवारी महिन्यातच सुरू केल्या आहेत. ते म्हणाले की, मार्चमध्ये आम्ही हजारो कोरोनाबाधितांवर उपचार केले. परंतु, आमच्या औषधाला मान्यता हवी असल्याने आम्हाला पुन्हा क्लिनिकल ट्रायल करणे गरजेचे होते.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यासाठी अजिबात अनुकूल नव्हती. म्हणून अखेर ग्रुपने क्लिनिकल ट्रायल रेग्युलेटर आफ इंडिया (सीटीआरआय) सोबत नोंदणी केली आहे आणि त्यांच्या जयपूर युनिव्हर्सिटीच्या अखत्यारीत असलेल्या विभागात क्लिनिकल ट्रायल सुरू केल्या आहेत. या कामासाठी ग्रुपकडे सध्या 500 हून अधिक संशोधक आहेत आणि आयुर्वेदिक पद्धतीनेच हे औषध शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही बाळकृष्ण यांनी सांगितले.