नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,506 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 895 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,08,040 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंतेत भर पडली आहे. त्रिपुरा राज्यातून पश्चिम बंगालमध्ये 'जिनोम सिक्वेन्सिंग'साठी पाठवण्यात आलेल्या 151 नमुन्यांपैंकी तब्बल 90 हून अधिक नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व नमुन्यांमध्ये कोरोनाचा 'डेल्टा प्लस व्हेरियंट' आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
'डेल्टा प्लस' या अतिशय वेगाने पसरणाऱ्या व्हेरियंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्रिपुराच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी यासंबंधी माहिती दिली आहे. त्रिपुरातील कोविड 19 चे एक नोडल अधिकारी डॉ. दीप देव वर्मा यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरातून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पश्चिम बंगालमध्ये 151 आरटी-पीसीआर नमुने पाठवण्यात आले होते. यातील 90 हून अधिक नमुन्यांत डेल्टा प्लस व्हेरियंटसहीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा चिंतेचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी 35 राज्य-केंद्रशासित प्रदेशांतील 174 जिल्ह्यांत SARS-CoV-2 करोना विषाणूचा 'चिंताजनक प्रकार' आढळल्याचं म्हटलं होतं. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यातील सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांत आढळले आहेत. याआधी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर आणि देवरियामध्ये डेल्टा प्लस कोविड 19 व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले होते. यातील एका 66 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
संकटं संपता संपेना! कोरोनानंतर Bell's Palsy चा सर्वाधिक धोका; 'ही' लक्षणं आढळल्यास वेळीच व्हा सावध
कोरोना रुग्णांना आता Bell's Palsy चा धोका असल्याचं समोर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याला लकवा मारणं. कोरोना रुग्णांमध्ये याचा सातपट अधिक धोका असल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युनिव्हर्सिटी हॉस्पिटल क्लीव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी एक नवा रिसर्च केला आहे. कोरोनाच्या एक लाख रुग्णांपैकी 82 जणांना बेल्स पाल्सी विकार झाल्याचं रिसर्चमध्ये आढळलं. तर कोरोना लस घेतलेल्या एक लाख लोकांपैकी फक्त 19 जणांना हा त्रास झाला. बेल्स पाल्सीपासून बचाव करण्यासाठी लस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश (Paralysis) विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धं शरीर निकामी होतं. बेल्स पाल्सीमध्ये चेहऱ्याच्या एका बाजूवर वाईट परिणाम होतो.